लातूर जिल्ह्यातील खंडापूर येथे पार पडलेल्या वारकरी संप्रदायाच्या भव्य सप्ताहानंतर निधीच्या वापराबाबत वाद अधिक तीव्र झाला असून, आयोजकांपैकी एक असलेल्या किशोर (महाजन) शिवणीकर महाराज यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करण्यात येत आहेत. याप्रकरणी काही आयोजकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दिल्याची माहिती समोर आली आहे.
सप्ताहात कोट्यवधींची देणगी- खंडापूर येथे झालेल्या सप्ताहाला मराठवाड्यासह बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, सोलापूर आदी भागांतून मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थिती लावली होती. सुमारे 200 महाराजांनी कीर्तनातून आवाहन केल्यानंतर शंभर रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत देणग्या जमा झाल्याचे सांगितले जात आहे.
हिशोब न दिल्याचा आरोप- आरोपकर्त्यांच्या मते, सप्ताह संपून दोन महिने उलटूनही जमा निधीचा अधिकृत हिशोब सादर करण्यात आलेला नाही. “भक्ती शक्ती धाम” या नावाने पावत्या छापून निधी गोळा करण्यात आल्याचा आणि ते खाते वैयक्तिक असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
देहू संस्थान संदर्भात प्रश्न- सप्ताह देहू येथील तुकाराम महाराज संस्थानच्या मार्गदर्शनाखाली घेण्याचे आणि उर्वरित निधी मंदिरासाठी देण्याचे पूर्वी ठरल्याचा दावा केला जात आहे. मात्र त्याची अंमलबजावणी झाली का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
मानधन व खर्चावर शंका- सप्ताहातील काही वक्त्यांना लाखोंचे मानधन दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र हे पैसे प्रत्यक्षात देण्यात आले का, याबाबत स्पष्टता नसल्याचे आरोपकर्त्यांचे म्हणणे आहे.
मालमत्ता खरेदीचा मुद्दा चर्चेत- उपलब्ध नोंदणी दस्तऐवजानुसार, मार्च 2026 मध्ये लातूर शहरात सरकारी किमतीनुसार सुमारे ₹35 लाख किंमतीची मालमत्ता खरेदी झाल्याची नोंद आहे. सप्ताहानंतर अल्पावधीत ही खरेदी झाल्याने, या व्यवहाराचा निधीशी काही संबंध आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तक्रार दिल्यानंतर घडामोडी
काही दिवस संबंधित व्यक्ती संपर्कात नसल्याची तक्रार आयोजकांनी केली होती. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दिल्यानंतर संबंधित व्यक्ती संपर्कात आल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याचेही समजते.
व्हॉट्सॲप स्टेटसबाबत नवा वाद
दरम्यान, वारकरी संप्रदाय, आयोजक आणि गावकरी हिशोबाची मागणी करत असताना संबंधित व्यक्तीने व्हॉट्सॲप स्टेटसवर हातात पिस्तूलसदृश वस्तू असलेले काही फोटो ठेवले असल्याचा दावा करण्यात येत आहे. या कृतीकडे काही जणांनी “दबाव किंवा अप्रत्यक्ष धमकी” म्हणून पाहिले जात असले, तरी याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी किंवा पोलीस प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
आयोजकांची भूमिका
आयोजकांचे म्हणणे आहे की, “सर्व व्यवहारांचा पारदर्शक हिशोब सर्व आयोजक आणि गावकऱ्यांसमोर सादर करावा.”
वारकरी संप्रदायात नाराजी
या प्रकरणामुळे वारकरी संप्रदायात नाराजी पसरली असून, हिशोब सादर करण्याची मागणी वाढत आहे.




Post a Comment
0 Comments