अंबादास करकरे
लातूर/उदगीर
उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने जप्त करण्यात यश मिळविले आहे. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्यास मदत झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ जानेवारी २०२६ रोजी फिर्यादी संध्याराणी महादेव जळकोटे (वय ३०, रा. गायकवाड अपार्टमेंट, नांदेड नाका, उदगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०/२०२६ कलम ३३१(४), ३०५ भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींची नावे राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षिरसागर (वय ३३, रा. गौरवाघोळी, येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव) आणि चंद्रकांत अनंत माने (वय ३३, रा. चिचोडगाव, चाफेकर चौक, वेताळनगर झोपडपट्टी, पिंपरी चिंचवड, पुणे) अशी आहेत. दोन्ही आरोपींना संभाजीनगर कारागृहातून ताब्यात घेण्यात आले.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे यांनी विशेष पथक तयार करून तपासाची चक्रे वेगाने फिरविली.
पोउपनि देवकर व डी.बी. पथकातील पोलीस हवालदार राम बनसोडे, नामदेव चेवले, राजकुमार डबेटवार, गजानन डफळे, राजकुमार देवडे, लोखंडे तसेच चालक यांनी संयुक्त कारवाई करत आरोपींकडून गुन्ह्याची कबुली मिळविली. आरोपींकडून अंदाजे ७५ हजार रुपये किमतीच्या तीन सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
तपासादरम्यान आरोपींनी उर्वरित चोरीचे सोन्याचे दागिने बार्शी येथील सोनार सुमित दीपक बागडे याच्याकडे दिल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार संबंधित सोनारालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवकर हे करीत आहेत.

Post a Comment
0 Comments