लातूर/अंबादास करकरे
रॉयल एज्युकेशन सोसायटी, लातूर यांच्या वतीने संचालित संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय (कॉमर्स), लातूर यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. एम. आर. पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य सत्कार समारंभ आणि “गौरवग्रंथ” प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा विशेष कार्यक्रम रविवार, दिनांक १० मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कॉमर्स कॉलेज कॅम्पस, अंबाजोगाई रोड, लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला शिक्षण, राजकारण, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याने कार्यक्रमाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा. ना. बाबासाहेब मोहोतराव पाटील हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. अमित विलासराव देशमुख उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मा. डॉ. एम. आर. पाटील यांचा अमृतमहोत्सवी सत्कार करण्यात येणार असून त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संस्थात्मक कार्याचा गौरव करणाऱ्या “गौरवग्रंथ” चे प्रकाशनही करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी मंत्री तथा लातूर ग्रामीणचे आमदार मा. धीरज विलासराव देशमुख, निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. संभाजीराव पाटील निलंगेकर, अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. बाबासाहेब पाटील, उदगीरचे आमदार मा. संजय बनसोडे, औसा मतदारसंघाचे आमदार मा. अभिमन्यू पवार, तसेच आमदार मा. विक्रम काळे, मा. रमेशअप्पा कराड, मा. डॉ. पी. आर. देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच पत्रकारिता, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभणार आहे. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार मा. श्री. विलास वडे, कुलगुरू मा. डॉ. नागोराव यारकर, समाजसेवक मा. प्राचार्य अभिमन्यू जाधव, तसेच मा. डॉ. डी. एन. चिवटे आदींचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे आयोजन रॉयल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आले असून कार्यकारी अध्यक्ष श्री. मधुकर गायकवाड व डॉ. नागोराव कुंभार यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Post a Comment
0 Comments