लातूर/अंबादास करकरे
लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील वेतन वितरण प्रक्रियेमध्ये मोठ्या आर्थिक अनियमिततेचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, तब्बल २ कोटी ३८ लाख ९२ हजार ०७ रुपयांच्या शासकीय निधीच्या अपहारप्रकरणी चौघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तिघांना तात्काळ अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १६ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी गजानन भातलवंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उदगीर तथा चौकशी अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरनं १९८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१६(४), ३१६(५), ३३६(२), ३३८, ३३६(३), ३४०(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये लिपिक राहुल गोविंदराव वागदरे, ब्रिजकिशोर ठाकूर, दत्तात्रय मारुती क्षिरसागर आणि श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अजय दिगंबर सूर्यवंशी यांचा समावेश आहे.
प्राथमिक चौकशीत मे २०१५ ते मार्च २०२५ या दहा वर्षांच्या कालावधीत आरोपींनी संगनमत करून वेतन अभिलेखांमध्ये खाडाखोड केल्याचे उघड झाले आहे. Incentive, Basic Arrears, Special Pay आणि इतर वेतन शीर्षकांच्या माध्यमातून बनावट दस्तऐवज तयार करून शासनाची रक्कम अपहार करण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपींनी अनधिकृतरीत्या जास्तीची रक्कम अदा करून त्यातील काही निधी स्वतःच्या बँक खात्यांमध्ये वळविल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
या गंभीर आर्थिक गैरव्यवहाराची माहिती समोर आल्यानंतर लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तपासासाठी पोलीस कोठडी मंजूर केली आहे. चौथ्या आरोपीबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लातूर जिल्हा पोलीस दलाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत निष्पक्ष आणि पारदर्शक तपास सुरू केला असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास श्री. समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर उपविभाग हे करीत आहेत.

Post a Comment
0 Comments