लातूर/अंबादास करकरे
लातूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्य, पर्यावरण आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने लातूर पोलिसांनी मार्च २०२६ महिन्यात अवैध धंद्यांविरोधात व्यापक आणि प्रभावी मोहीम राबवली. या मोहिमेत तब्बल ३८३ गुन्हे दाखल करण्यात आले असून ₹५,४०,८३,६६५/- इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दल आणि स्थानिक गुन्हे शाखेने ही मोहीम राबवली. यामध्ये जिल्हाभर सातत्यपूर्ण छापेमारी, गुप्त माहितीचे संकलन आणि समन्वयित कारवाई करण्यात आली.
मार्च महिन्यात विशेषतः अवैध मद्यविक्री, जुगार, अमली पदार्थ, प्रतिबंधित गुटखा तसेच अवैध वाळू उपसा व वाहतूक या गंभीर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या अंतर्गत विविध कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस आले.
अवैध दारू विक्री व गावठी दारूनिर्मिती प्रकरणी २५७ गुन्हे दाखल करण्यात आले असून ₹१२,८१,७८५/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगारविरोधी कारवायांमध्ये ७७ गुन्हे नोंदवून ₹२९,८३,९६०/- इतकी रक्कम हस्तगत करण्यात आली. अमली पदार्थांविरोधात कारवाई करताना गांजा प्रकरणी १ गुन्हा दाखल करून ₹५,२२,०७५/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोग्यास घातक असलेल्या प्रतिबंधित गुटखा तस्करीविरोधातही पोलिसांनी कठोर भूमिका घेत २० गुन्हे नोंदवले असून तब्बल ₹६६,८८,३४५/- किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतूक प्रकरणी १५ गुन्ह्यांमध्ये ₹४,२६,०७,५००/- इतका मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला, ही कारवाई विशेष उल्लेखनीय ठरली आहे.
तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठी धोका ठरू शकणाऱ्या बेकायदेशीर शस्त्रसाठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आर्म अॅक्ट अंतर्गत १३ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या सर्व कारवायांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने मोलाची भूमिका बजावली आहे. स्वतंत्रपणे करण्यात आलेल्या कारवायांमध्ये दारू विषयक १८ गुन्हे (₹२,६५,८८०/-), जुगाराचे १२ गुन्हे (₹८१,४९०/-), गांजा १ गुन्हा (₹५,२२,०७५/-), गुटखा ४ गुन्हे (₹३,४०,३०५/-), अवैध वाळू प्रकरणी १ गुन्हा (₹५,०५,०००/-) तसेच आर्म अॅक्ट अंतर्गत २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही मोहीम केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नसून लातूर पोलिसांची गुन्हेगारीविरोधातील ठाम भूमिका, कार्यक्षमता आणि सक्रियता अधोरेखित करणारी आहे. अवैध धंद्यांमुळे समाजाच्या आरोग्यावर आणि कायदा-सुव्यवस्थेवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता, अशा कारवाया पुढील काळात अधिक तीव्रतेने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



Post a Comment
0 Comments