Type Here to Get Search Results !

नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी स्वीकारला पदभार; प्रशासनात नवा उत्साह




लातूर/अंबादास करकरे 

लातूर, दि. ०४ – लातूर जिल्ह्याच्या प्रशासनाला नवे नेतृत्व लाभले असून नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज (दि. ०४) अधिकृतपणे पदभार स्वीकारला. मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द करत स्वागत केले आणि पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

पदभार स्वीकृतीच्या या औपचारिक कार्यक्रमात जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे, तसेच तहसीलदार सौदागर तांदळे यांचा समावेश होता.

नूतन जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. प्रशासन अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि परिणामकारक करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी संकेत दिले. नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडविणे, विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविणे आणि जिल्ह्यातील विकासकामांना गती देणे हे प्राधान्यक्रम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. त्यांच्या कार्याची दखल घेत उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या पदभार स्वीकृतीमुळे लातूर जिल्हा प्रशासनात नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात विकासकामांना अधिक वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments