लातूर/ अंबादास करकरे
लातूर, दि. ६ : औसा तालुक्यातील शिवली येथील जागृत श्री हनुमान देवस्थानच्या कृपा आशीर्वादामुळे आपण विधानसभेचे आमदार झालो असून, शिवली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही भाजपाचे नेते व लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार रमेशअप्पा कराड यांनी दिली.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भादा सर्कलमधील शिवली गावात, श्री हनुमान मंदिर परिसरात आमदार निधीतून सुमारे १५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या भव्य सभा मंडपाचे लोकार्पण रविवारी आ. कराड यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. या वेळी परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
आ. कराड यांच्या आगमनावेळी गावकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. संपूर्ण कार्यक्रम भक्तिभावाने रंगून गेला होता. यावेळी बोलताना आ. कराड म्हणाले की, “यापूर्वी मी विधान परिषदेचा आमदार असताना हनुमान मंदिराच्या सभा मंडपासाठी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यातून आज हे भव्य सभागृह उभे राहिले आहे. शिवलीच्या मारुती रायाच्या कृपा आशीर्वादामुळे आणि गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच मी विधानसभेचा आमदार झालो आहे.”
पुढे ते म्हणाले की, “शिवली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध असून, भविष्यात गावातील सर्व मंदिरांच्या जिर्णोद्धारासाठीही प्रयत्न करणार आहे.”
या कार्यक्रमास भाजपाचे विक्रमकाका शिंदे, पद्माकर चिंचोलकर, संदीपान शेळके, शरद दरेकर, अॅड. दशरथ सरवदे, उद्धव काळे, बालाजी शिंदे, राजकिरण साठे, शिवराज राठोड, गुणवंत कारंडे, अच्युत ईरपे, सोमनाथ पावले, महादेवअप्पा गुरुशेट्टे, प्रदीप शिंदे, देवराव मोहिते, रविंद्र पाटील, महादेव आळणे, व्यंकट रसाळ यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय शिवली व परिसरातील भाविक महिला-पुरुष, तसेच भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments