लातूर /अंबादास करकरे
लातूर, दि. 08 एप्रिल 2026 — कासार सिरसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेला आणखी एक यश मिळाले असून दोन फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी या प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली होती.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कासार सिरसी पोलीस स्टेशन गु.र.नं. 55/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 310(2), 311 तसेच भा.ह.का. कलम 3, 25 अंतर्गत हा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधार बावकर यांनी विशेष पथक तयार करून फरार आरोपींचा शोध सुरू केला. दिनांक 07 एप्रिल रोजी सहायक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील उमरगा परिसरात शोध मोहीम राबवली.
उमरगा-आळंद रोडवरील भुसणी टी-पॉईंट येथे सापळा रचून दुपारी सुमारे 3.15 वाजता दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत, संजयसिंग अमरसिंग राठोड उर्फ राजपूत (रा. चोसला, राजस्थान), रेवण उर्फ रोहन उर्फ बंटी बिरु सोनटक्के (रा. मुरुम, ता. उमरगा, जि. धाराशिव, सध्या रा. दिघी, पुणे)
चौकशीदरम्यान आरोपींनी इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली इनोव्हा क्रिस्टा कार लातूर शहरातून चोरी केल्याचेही उघड झाले आहे. हीच कार (क्र. MH 24 AS 5200) विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु.र.नं. 155/2026 या वाहन चोरी प्रकरणातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या कारवाईमुळे गुन्ह्याचा तपास अधिक बळकट झाला असून संपूर्ण टोळी उघडकीस येण्याची शक्यता वाढली आहे. अटक केलेल्या आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कासार सिरसी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधार बावकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ आणि त्यांच्या पथकातील माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, राजेश कंचे, गणेश साठे, श्रीनिवास जांभळे, शैलेश सुडे आणि अंजली गायकवाड यांनी यशस्वीपणे पार पाडली.

Post a Comment
0 Comments