लातूर/अंबादास करकरे
लातूर तालुका संजय गांधी निराधार योजना समिती नुकतीच गठीत करण्यात आली असून समितीच्या अध्यक्ष व सदस्यांनी लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांचा सत्कार करून समितीमार्फत गोरगरीब, निराधार आणि गरजू नागरिकांना आधार देण्यासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार रमेशआप्पा कराड यांच्या शिफारशीनुसार लातूर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची स्थापना केली आहे. या समितीवर विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांच्या प्रश्नांवर काम करण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात समितीच्या वतीने आमदार रमेशआप्पा कराड यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. समिती अध्यक्ष बन्सी भिसे आणि सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन करत समाजातील वंचित, निराधार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी समिती अध्यक्ष बन्सी भिसे यांनी बोलताना सांगितले की, संजय गांधी निराधार योजना ही समाजातील गरजूंसाठी अत्यंत महत्त्वाची योजना असून तिचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी समिती सक्रियपणे काम करणार आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे सदस्य महादेव साळुंके, पद्माकर चिंचोलकर, महेंद्र गोडभरले, भाजपाचे मंडल अध्यक्ष प्रताप पाटील, सुरज शिंदे, उद्धव काळे, ॲड. मनोज कराड, दीपक वांगसकर, राजकिरण साठे, ॲड. धनराज शिंदे, भैरवनाथ पिसाळ, शुभम खोसे, अशोक सावंत, बाळासाहेब कदम, पांडुरंग कदम, किशोर घुटे यांच्यासह संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य स्वाती घुटे, संतोष गायकवाड, सदाम रशीद शेख, रुपेश काळे, बाबासाहेब भिसे, सदाशिव गव्हाणे, अंकुश कुंभार, विनायक मगर, परमेश्वर पर्वते आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी समितीच्या कार्याला शुभेच्छा देत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.


Post a Comment
0 Comments