लातूर /अंबादास करकरे
लातूर जिल्हा पोलीस दल केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारी यंत्रणा नसून प्रामाणिकपणा, नैतिकता आणि माणुसकी जपणारे दल असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित करणारी घटना लातूर शहरात घडली आहे. विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब खोडेवाड यांनी रस्त्यावर सापडलेली तब्बल १० लाख रुपये किमतीची सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी भरलेली बॅग सुरक्षितपणे मूळ मालकाच्या स्वाधीन करून “खाकीतील माणुसकी”चा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
आजच्या धकाधकीच्या आणि स्वार्थी वातावरणात मोठ्या किमतीचा ऐवज सापडल्यास अनेकजण चुकीचा मार्ग स्वीकारतात. मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब खोडेवाड यांनी प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा उच्च आदर्श निर्माण करत “पोलीस म्हणजे जनतेचा खरा संरक्षक” ही भावना अधिक दृढ केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ मे २०२६ रोजी रात्री ११ ते ११.४० वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक खोडेवाड हे त्यांच्या मित्रासह खाजगी वाहनाने जात होते. यावेळी ते सुशीलादेवी कॉलेजच्या पाठीमागील गेट परिसरात आले असता रस्त्याच्या कडेला एक काळ्या रंगाची बॅग संशयास्पद स्थितीत पडलेली दिसून आली.
संशय आल्याने त्यांनी तत्काळ वाहन थांबवून बॅगची पाहणी केली. सुरुवातीला बॅगमध्ये लहान मुलांचे कपडे, पॅम्पर्स आणि इतर साहित्य आढळून आले. मात्र त्याखाली सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने असल्याचे दिसून आले. प्राथमिक पाहणीत अंदाजे ६ ते ७ तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे १ तोळा चांदीचे दागिने मिळून आले असून त्यांची एकूण किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचे स्पष्ट झाले.
ही बॅग एखाद्या कुटुंबाकडून मोटारसायकलवर प्रवास करताना नकळत रस्त्यावर पडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. इतक्या मोठ्या किमतीचा मुद्देमाल मिळूनही सहाय्यक पोलीस निरीक्षक खोडेवाड यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सदर बॅग सुरक्षित ताब्यात घेतली आणि तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बॅगच्या मूळ मालकाचा शोध घेण्यात आला. तपासाअंती ही बॅग प्रकाशनगर येथील सौ. ज्योती प्रतीक पांचाळ यांची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आवश्यक पडताळणी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सदर मुद्देमाल मूळ मालकाच्या स्वाधीन करण्यात आला.
या प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष कृतीबद्दल लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष पाटील यांच्यासह नागरिकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब खोडेवाड यांचे कौतुक केले आहे.
“खाकी वर्दीतही नैतिकता, संवेदनशीलता, माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत आहे,” हे या घटनेतून अधोरेखित झाले असून पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणारी ही घटना सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.


Post a Comment
0 Comments