Type Here to Get Search Results !

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाचा किनवटमध्ये जुगार अड्ड्यावर छापा अवैध व्यवसायांविरोधात मोठी मोहीम; १०३ गुन्हे दाखल, १२६ जणांविरुद्ध कारवाई


नांदेड /अंबादास करकरे 

नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय विरोधी मोहिमेला वेग आला असून, पोलीस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाने किनवट तालुक्यातील दत्तनगर गोकुंदा येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह तब्बल ३ लाख ८८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनाकडून १ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या १६ व्या दिवशी विविध जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी धडक कारवाया करण्यात आल्या.

याच मोहिमेअंतर्गत अवैध गुटखा विक्री करणाऱ्या दोन जणांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ८ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच मटका आणि जुगार खेळणाऱ्या तसेच चालविणाऱ्या ३३ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत १२ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत ११ लाख ८६ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दरम्यान, अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधातही मोठी मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत ७९ जणांविरुद्ध ७८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून ८ लाख ४ हजार २४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात दोन गुन्हे दाखल करून तब्बल ३० लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय शस्त्र अधिनियमांतर्गत ३, कोटपा कायद्यान्वये ६ आणि इतर विविध कायद्यांखाली मिळून एकूण १०३ कारवाया करण्यात आल्या. या सर्व कारवायांमध्ये एकूण १२६ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५३ लाख ९३ हजार ११२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

‘खबर’ हेल्पलाइनला नागरिकांचा प्रतिसाद

अवैध व्यवसायांविषयी नागरिकांना थेट पोलिसांशी संपर्क साधता यावा यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून ‘खबर’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. ९१ ५० १०० १०० या मोबाईल क्रमांकावर नागरिक फोन अथवा व्हॉट्सअॅपद्वारे माहिती देऊ शकतात.

पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरातील अवैध धंद्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. नागरिकांच्या सहकार्यामुळे अशा अवैध व्यवसायांवर अधिक प्रभावी कारवाई करणे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments