लातूर /अंबादास करकरे
निलंगा शहर परिसरात दिवसाढवळ्या घरफोड्या करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून, त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३८ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे निलंगा शहरातील सलग घडलेल्या घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
लातूर जिल्ह्यात मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.
दि. १६ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक निलंगा परिसरात गस्त घालत असताना हाडगा नाका परिसरात गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, निलंगा-औसा रोडवरील मीना निंबाळकर पेट्रोलपंपासमोर चोरीचे सोन्याचे दागिने घेऊन एक संशयित इसम थांबलेला आहे.
माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित इसमाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव राजू ऊर्फ राजाराम कुंडलीक म्हेत्रे (वय २९, रा. शिवाजीनगर, निलंगा, जि. लातूर) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून विविध प्रकारचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आढळून आली.
पोलिसांनी विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपीने निलंगा शहरातील विविध भागांमध्ये दिवसाढवळ्या बंद घरांचे कुलूप तोडून चोरी केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान पोस्टे निलंगा येथे गुन्हा क्रमांक ९३/२०२६, ९४/२०२६ आणि १३७/२०२६ हे गुन्हे भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) व ३३१(३) अंतर्गत दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विविध वजनांच्या सोन्याच्या अंगठ्या, कानातील झुमके तसेच १० हजार रुपये रोख रक्कमेचा समावेश आहे. एकूण ४९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले असून, जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे ३ लाख ३८ हजार १२५ रुपये इतकी आहे.
तपासात आरोपीने निलंगा शहरातील आर्य समाज गल्ली, ब्राईट गिरीजा नगरी, दापका आणि शिवाजीनगर परिसरात घरफोड्या केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून बंद घरांची रेकी करून घरमालक बाहेर गेल्यानंतर कुलूप तोडून चोरी करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
सदर आरोपीला पुढील तपासासाठी निलंगा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही उल्लेखनीय कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार नवनाथ हासबे, माधव बिलापट्टे, रामलिंग शिंदे, तुराब पठाण, गणेश साठे तसेच सायबर सेलचे शैलेष सुडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

Post a Comment
0 Comments