लातूर/अंबादास करकरे
लातूर जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष ज्योतीराम चिवडे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांचे डीपी दुरुस्त न झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची गाढवावर बसवून धिंड काढण्याचा सज्जड इशारा दिला आहे.
लातूर जिल्ह्यात पावसाळा तोंडावर आलेला असतानाही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे डीपी, कीटकॅट व वीज यंत्रणा अत्यंत खराब अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असून, यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचे चिवडे पाटील यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन ज्योतीराम चिवडे पाटील यांनी आज लातूर येथे महावितरणचे उपअभियंता लोहारे यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी राज्य व केंद्र सरकार शेतकरी आणि कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे असताना, काही अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.
यावेळी बोलताना चिवडे पाटील म्हणाले की, “राज्य सरकारने पाच एचपीपर्यंतचा वीजपुरवठा माफ केला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असताना काही अधिकारी हलगर्जीपणा करत आहेत. अशा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही.” तसेच त्यांनी लातूर जिल्ह्यातील नेते संभाजी पाटील निलंगेकर, रमेश आप्पा कराड, अभिमन्यू पवार तसेच माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करत, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नासाठी संघर्ष करत असल्याचे सांगितले.
चिवडे पाटील यांनी भाजपचे युवा जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांचाही उल्लेख करत, ते शेतकरी आणि कामगारांप्रती अत्यंत संवेदनशील असल्याचे नमूद केले. “माझा शेतकरी राजा आणि कामगार अडचणीत आला तर आम्ही ढाल बनून उभे राहू. मात्र, अधिकारी जर शेतकऱ्यांना त्रास देत असतील तर त्यांना सोडले जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, शेतकऱ्यांचे डीपी पुढील १५ दिवसांत दुरुस्त न झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची गाढवावर बसवून धिंड काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा दिला.यावेळी कामगार मोर्चाचे सरचिटणीस विकास घोडके, उपाध्यक्ष दामोदर शिंदे, नागनाथ भुसे, युवराज चिवडे, महेश पांचाळ, जगन्नाथ शिंदे यांच्यासह शेतकरी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments