लातूर, दि. २० मे २०२६ : तंत्रशुद्ध, निष्पक्ष आणि पुराव्यावर आधारित तपासामुळे कासार शिरशी पोलीस ठाण्याने तपास केलेल्या दोन स्वतंत्र मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी प्रकरणांमध्ये मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय, निलंगा यांनी एकूण सहा आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयाने साक्षीपुरावे, वैद्यकीय अहवाल, घटनास्थळ पंचनामे आणि सरकारी पक्षाचा प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपींना शिक्षा ठोठावली.
पहिल्या प्रकरणात पोलीस स्टेशन कासार सिरशी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १५१/२०१९ अन्वये भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी मेघा जनार्धन फुले या त्यांच्या बोळेगाव येथील घरी असताना आरोपींनी बांधाच्या कारणावरून वाद घालत संगनमताने मारहाण केली होती. आरोपी जयाबाई जयवंत फुले यांनी फिर्यादीस चावा घेऊन जखमी केले, तर आरोपी लक्ष्मण जयवंत फुले यांनी काठीने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या प्रकरणात आरोपी जयाबाई जयवंत फुले, लक्ष्मण जयवंत फुले आणि सोनाली लक्ष्मण फुले यांना दोषी ठरवत न्यायालयाने भादंवि कलम ३२४ अन्वये प्रत्येकी दोन महिने साधी कैद व तीन हजार रुपये दंड, कलम ३२३ अन्वये प्रत्येकी दोन महिने साधी कैद व एक हजार रुपये दंड तसेच कलम ५०४ अन्वये प्रत्येकी एक महिना साधी कैद व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
दुसऱ्या प्रकरणात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६८/२०१६ अन्वये भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी आतिक युसुफ कालचीवे हे शेताकडे जात असताना आरोपी मोटारसायकलवरून त्यांच्या मागून आले. जागेच्या व्यवहारासंदर्भात तक्रार का केली, या कारणावरून आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर मोटारसायकलवरील टिकाव काढून त्याच्या तुंब्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या प्रकरणात आरोपी मोहसीन बब्रू कालचीवे, सत्तार मैनुद्दीन कालचीवे आणि रुकूम चांद कालचीवे यांना दोषी ठरवत न्यायालयाने भादंवि कलम ३२४ अन्वये प्रत्येकी सहा महिने साधी कैद व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड, कलम ३२३ अन्वये प्रत्येकी एक महिना साधी कैद व प्रत्येकी एक हजार रुपये दंड तसेच कलम ५०४ अन्वये प्रत्येकी सहा महिने साधी कैद व प्रत्येकी एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
सदर दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस अंमलदार प्रदीप जाधव तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर चव्हाण यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत बारकाईने आणि तंत्रशुद्ध पद्धतीने पूर्ण केला. तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे, घटनास्थळ पंचनामे आणि इतर तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करून न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सरकारी वकील व्ही. एन. म्हेत्रे यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट अंमलदार व पैरवी अंमलदार एन. एन. बेडदे, समीर कोरबू आणि विकास मुगळे यांनी दोन्ही प्रकरणांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यासाठी विशेष मेहनत घेतली.
लातूर पोलीस दलाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येक गुन्ह्याचा निष्पक्ष, वेगवान आणि पुराव्यावर आधारित तपास केला जात असून सामाजिक शांतता भंग करणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतत दक्ष असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Post a Comment
0 Comments