अंबादास/करकरे
लातूर : अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा पोलीस दलात पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्यांची मोठी प्रक्रिया पारदर्शक आणि संवेदनशील पद्धतीने पार पडली असून तब्बल ३१५ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या प्रक्रियेमुळे पोलीस दलात समाधानाचे व सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस अंमलदार अशा विविध पदांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सध्याच्या पोलीस ठाणे अथवा शाखेमध्ये पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केली होती. महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय व परिपत्रकातील नियमांनुसार या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली.
आस्थापना मंडळाच्या बैठकीत प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाभिलेखाचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. पोलीस ठाणेनिहाय रिक्त पदे, संबंधितांची कार्यक्षमता, कौटुंबिक परिस्थिती, आरोग्यविषयक अडचणी, मुलांचे शिक्षण, प्रवासातील गैरसोय तसेच वैयक्तिक अडचणी यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
विशेष म्हणजे, बदली प्रक्रियेत संबंधित अधिकारी व अंमलदारांना आवश्यक कागदपत्रांसह समक्ष आज्ञांकित कक्षामध्ये बोलावून त्यांची बाजू ऐकून घेण्यात आली. त्यानंतर आस्थापना मंडळाने सर्वानुमते शिफारशी केल्या आणि अखेरीस पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी प्रशासकीय दृष्टीकोन ठेवून अंतिम निर्णय घेत बदल्यांचे आदेश जारी केले.
या प्रक्रियेमध्ये जवळपास सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार पोलीस ठाणे अथवा शाखेमध्ये बदली मिळाल्यामुळे पोलीस दलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वैयक्तिक अडचणी दूर होण्यास मदत झाली असून त्यांच्या कुटुंबीयांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बदलीनंतर संबंधित अधिकारी व अंमलदार नव्या ठिकाणी अधिक सकारात्मक ऊर्जा, कार्यक्षमता व जबाबदारीने काम करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांना अधिक तत्पर, प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण पोलीस सेवा देण्यासाठी अशा संवेदनशील व पारदर्शक निर्णयांची मोठी मदत होणार असल्याचेही सांगण्यात आले.

Post a Comment
0 Comments