लातूर /अंबादास करकरे
पुणे येथे दिनांक २४ मे २०२६ रोजी पार पडलेल्या 25th LXT Speed Skating Championship 2026 स्पर्धेमध्ये उदगीर तालुक्यातील तोगरी गावच्या चिमुकली कु. वैष्णवी वैजनाथ बोंडगे हिने उल्लेखनीय यश संपादन करत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत इनलाइन स्केटिंग ४०० मीटर प्रकारामध्ये वैष्णवीने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. अवघ्या लहान वयात तिने दाखवलेल्या वेग, आत्मविश्वास आणि मेहनतीमुळे उपस्थितांकडून तिचे विशेष कौतुक करण्यात आले.
वैष्णवीच्या या यशामुळे तोगरी गावासह संपूर्ण उदगीर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही क्रीडा क्षेत्रात मोठी क्षमता असून योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर राज्यस्तरावर यश मिळवता येते, हे वैष्णवीने आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे.
या यशामागे सखा क्रीडा मंडळ यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून मंडळाचे सचिव सिकंदर आडे तसेच मार्गदर्शक ऋषिकेश चव्हाण यांनी वैष्णवीला योग्य प्रशिक्षण व प्रेरणा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवीने सातत्याने सराव करून हे यश संपादन केले आहे.
वैष्णवी वैजनाथ बोंडगे हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गावकऱ्यांनी, पालकांनी तसेच क्रीडाप्रेमींनी तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments