लातूर /अंबादास करकरे
लातूर, दि. २४ मे २०२६ : अनुसूचित जातींमधील ५९ जातींना न्याय्य हक्क मिळावा आणि अ, ब, क, ड उपवर्गीकरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी लातूर येथे जनआंदोलन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सीतापुरकर सर यांनी ५९ जातींची व्यथा मांडत सामाजिक न्यायासाठी तीव्र भावना व्यक्त केल्या, तर माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी “जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,” असा ठाम इशारा दिला.
या बैठकीत मातंग समाजातील विविध कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, युवक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. “हक्क, संघर्ष आणि क्रांती” या घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले होते.
डॉ. शेकापूरकर सर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अनुसूचित जातींमधील अनेक वंचित समाजघटक आजही शिक्षण, नोकरी, राजकीय प्रतिनिधित्व आणि आर्थिक प्रगतीपासून दूर आहेत. आरक्षणाचा लाभ काही मोजक्या समाजांपुरता मर्यादित राहिल्याने ५९ जातींमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे अ, ब, क, ड उपवर्गीकरण हा कोणत्याही समाजाच्या विरोधातील विषय नसून समान न्याय आणि घटनात्मक हक्क मिळवून देण्याचा लढा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयानेही विविध खटल्यांमध्ये उपवर्गीकरणाच्या मुद्याला महत्त्व दिले असून, वंचित घटकांपर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचण्यासाठी स्वतंत्र वर्गीकरण आवश्यक असल्याचे मत व्यक्त झाले आहे. “समाजात संभ्रम निर्माण करून वंचितांना त्यांच्या हक्कांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. मात्र आता समाज जागृत झाला असून आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरला आहे,” असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी अत्यंत आक्रमक आणि भावनिक भाषण करत ५९ जातींची वेदना मांडली. “संविधानाने दिलेला आरक्षणाचा अधिकार प्रत्येक अनुसूचित जातीपर्यंत पोहोचायला हवा. अनेक समाज आजही उपेक्षित आहेत. आमच्या तरुणांना शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सन्मानासाठी संघर्ष करावा लागत आहे,” असे ते म्हणाले.
“आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. मात्र आमच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत आहोत. जोपर्यंत ५९ जातींना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही,” असे ठाम शब्दांत सांगत त्यांनी उपस्थितांना संघटित राहण्याचे आवाहन केले.
या बैठकीत राज्यभर जनजागृती मोहीम राबविणे, समाजातील तरुणांना संघटित करणे आणि उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी व्यापक आंदोलन उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली. सामाजिक न्यायासाठीचा हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.

Post a Comment
0 Comments