Type Here to Get Search Results !

रक्तदानासाठी प्रलोभन देण्याची वाढती स्पर्धा चिंताजनक; सुरक्षित रक्तपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह



लातूर : रक्तदान हे समाजातील सर्वात पवित्र आणि जीवनदायी कार्य मानले जाते. “रक्तदान हे स्वेच्छेने, नि:स्वार्थपणे आणि कोणत्याही मोबदल्याशिवाय केले गेले पाहिजे,” अशी स्पष्ट भूमिका जागतिक आरोग्य संघटना (WHO) तसेच भारत सरकारने घेतली आहे. मात्र, सध्या लातूर शहरात रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रलोभने देऊन रक्तदाते आकर्षित करण्याची स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र दिसून येत असून, याबाबत सामाजिक स्तरावर चिंता व्यक्त होत आहे.

तज्ज्ञांच्या मते, रक्तदानासाठी भेटवस्तू, रोख रक्कम, सवलती, आकर्षक बक्षिसे किंवा इतर लाभ देणे हे केवळ चुकीचेच नसून कायद्याच्या विरोधात आहे. Drugs and Cosmetics Act, 1940 आणि National Blood Policy, 2002 नुसार रक्त विकत घेणे किंवा विकणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तसेच National Blood Transfusion Council (NBTC) च्या मार्गदर्शक तत्वांनुसार केवळ “Voluntary Non-Remunerated Blood Donation” अर्थात स्वेच्छेने आणि कोणताही मोबदला न घेता केलेल्या रक्तदानालाच मान्यता देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित रक्तपेढीचा परवाना रद्द होण्याची शक्यता असते.

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, प्रलोभनामुळे रक्ताच्या सुरक्षिततेलाही मोठा धोका निर्माण होतो. पैसे किंवा बक्षिसांच्या मोहापोटी काहीजण स्वतःच्या आरोग्याची खरी माहिती लपवू शकतात. HIV, Hepatitis B/C, Syphilis यांसारख्या गंभीर संसर्गजन्य आजारांचा इतिहास दडवला गेल्यास रुग्णांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो. विशेषतः “Window Period” दरम्यान संसर्ग चाचणीत लगेच निदान होत नसल्याने संक्रमित रक्त रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा धोका वाढतो. WHO च्या माहितीनुसार, मोबदला घेणाऱ्या रक्तदात्यांच्या रक्तात संसर्गाचे प्रमाण हे स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांच्या तुलनेत तीन ते चार पट अधिक आढळते.

सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, रक्तदान ही मानवतेची सेवा आहे. त्याचे व्यवहारात रूपांतर झाल्यास “दान” या संकल्पनेचे पावित्र्य कमी होते. आर्थिक अडचणीत असलेले, कुपोषित किंवा व्यसनाधीन लोक पैशांच्या गरजेसाठी वारंवार रक्तदान करण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे त्यांच्या स्वतःच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. एकदा प्रलोभनाची सवय लागल्यानंतर लोक विनामूल्य रक्तदान करण्यास मागे पडतात आणि “जीवदान” ही भावना संपुष्टात येऊन त्याचे “सौद्यात” रूपांतर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, रक्तदान चळवळ मजबूत करण्यासाठी जनजागृती हाच सर्वात योग्य मार्ग आहे. रक्तदानाबाबतचे गैरसमज दूर करणे, रक्ताची गरज आणि महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे, रक्तदात्यांचा सन्मान करणे, स्वच्छ आणि सुसज्ज शिबिरे आयोजित करणे तसेच नियमित रक्तदाते तयार करण्यासाठी समुपदेशन करणे आवश्यक आहे. १८ ते ६५ वयोगटातील निरोगी व्यक्तींनी दर तीन महिन्यांनी रक्तदान करण्याचा संकल्प केला तर रक्तटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.

विशेषतः शासकीय रक्तपेढ्यांमध्ये रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कारण गंभीर रुग्ण, थॅलेसेमिया बाधित मुले, अपघातग्रस्त रुग्ण आणि गरीब नागरिकांना शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत असते. खासगी रक्तपेढी चालक आणि रक्तदान शिबीर आयोजकांनीही सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून प्रलोभनमुक्त रक्तदान चळवळ उभी करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

“प्रलोभनाने रक्त मिळेल, पण ते सुरक्षित असेलच याची खात्री नाही. एका रुग्णाचा जीव वाचवताना दुसऱ्या रुग्णाला संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे,” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे “रक्तदान करा, पण ते काही मिळवण्यासाठी नव्हे तर जीव वाचवण्यासाठी करा,” हा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज निर्माण झाली आहे.

- मुक्त पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते 

सतीश तांदळे

माझं लातूर परिवार

Post a Comment

0 Comments