लातूर/अंबादास करकरे
जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी वाहतूक नियमांबाबत व्यापक जनजागृती करणे अत्यंत आवश्यक असून, चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्ट आणि दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर अनिवार्यपणे केल्यास अपघाती मृत्यूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटू शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, कार्यकारी अभियंता अलका डाके, एनआयसीचे पुरुषोत्तम रुक्मे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत रस्ते अपघातांची माहिती संकलित करण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या आयआरएडी (iRAD) पोर्टलच्या प्रभावी अंमलबजावणीवर विशेष भर देण्यात आला. जिल्ह्यात घडणाऱ्या प्रत्येक अपघाताची माहिती संबंधित विभागांनी विहित कालावधीत पोर्टलवर अपलोड करावी आणि त्यामध्ये कोणताही विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी दिले. यावेळी त्यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करताना, नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते, असे सांगितले.
बैठकीत बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अपघाती मृत्यूंपैकी जवळपास ७० टक्के मृत्यू हे दुचाकी अपघातांमध्ये होतात. हेल्मेटचा नियमित वापर केल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रीय व राज्य महामार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक उभारल्यास महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
बैठकीत रस्ते सुरक्षा उपाययोजना, अपघात प्रतिबंधक उपाय, जनजागृती मोहीम आणि विविध विभागांमधील समन्वय यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

Post a Comment
0 Comments