लातूर/अंबादास करकरे
लातूर स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल २० वर्षांपासून फरार असलेल्या आर्म ॲक्टमधील आरोपीला परजिल्ह्यातून अटक केली आहे. सिद्धेश्वर ऊर्फ सिद्राम ऊर्फ पिंटू वसंत मुळे (वय ४१, रा. डाळींब, ता. उमरगा, जि. धाराशिव) याला उमरगा परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
सन २००६ मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बेकायदेशीर गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस व शस्त्रनिर्मिती साहित्य प्रकरणात तो फरार होता. आरोपीने दोन दशके वास्तव्य व ओळख बदलून पोलिसांना चकवा दिला होता.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे उमरगा येथील डाळींब गावातून आरोपीला अटक केली.
न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment
0 Comments